आध्यात्मिक मार्गावर चालणारे साधक, जे वास्तविक आसक्त प्रवृत्तीतून जागरूकतेत येण्याच्या प्रक्रियेत आहेत, त्यांना आसक्त सवयींमधे अडकलेल्या व्यक्तींच्या सहवासात राहणे हानिकारक ठरू शकते का?  सद्गुरू येथे संग किंवा योग्य संगतीचे महत्त्व सांगत आहेत.  माणसाने कशा प्रकारची संगत जोडावी हे स्पष्ट करत आहेत?

प्रश्न: सद्गुरू, मी फ्लॅट शेअरिंग पद्धतीने राहतो आणि मी खूप काळ बाहेरगावी जाणार असेन तर माझी खोली लोकांना भाड्याने रहायला देतो. अनेक प्रकारची माणसं तिथे राहतात - एकदा एका मुलीला आणि काही जोडप्यांनाही अमली पदार्थांचे व्यसन लागले. मी विचार करतोय की या गोष्टींचा माझ्यावर काही परिणाम होईल का?  तुम्हाला काय वाटतं याविषयी?

सद्गुरू: लोकांच्या सहवासाचा तुमच्यावर होणारा परिणाम कमी समजू नका. तुम्ही स्वत: जरी मद्यपान करत नसाल किंवा अमली पदार्थ घेत नसाल तरी ते घेणाऱ्यांच्या सहवासाचा परिणाम एका वेगळ्याच पातळीवर होत असतो. गौतम बुद्धांनी परमसत्य, सत्याचा प्रसारक आणि संघ (म्हणजे ते कोणत्या प्रकारच्या संगतीत वावरतात) या तिन्ही गोष्टी एकसमान महत्वाच्या आहेत असे म्हटले आहे. बुद्ध या बाबतीत सामाजिकदृष्ट्या बरोबर आहेत पण अस्तित्वाच्या दृष्टीने योग्य नाही. खरं पाहता, सर्वात प्राथमिक मुलभूत गोष्ट संघ किंवा संगती असली पाहिजे, मग बुद्ध किंवा सत्याचे प्रसारक आणि मग धम्म किंवा परमसत्य.

बहुतेक लोक जाणतेपणे किंवा अजाणतेपणे त्यांच्या संगतीच्या प्रभावाखाली घडतात. त्यांना याची कल्पनाही नसते की त्यांच्या संगतीचा प्रभाव किती खोलवर झालेला आहे ते. केवळ कुटुंबातील व्यक्ती आणि मित्रच नव्हे तर एकूणच समाजाशी आलेला संबंध, या सर्वांचा प्रभाव पडतो. मी तर म्हणेन की तुमचा समाजाशी आलेल्या संबंधाने ९०% तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिलेला आहे. काही विशिष्ट माणसांच्या सहवासात राहणे म्हणजे लोकांमधे भेदभाव करणे नव्हे, तर त्याचा अर्थ आपण कुठे आणि कुणासोबत असावं याचा विवेक असणं हा आहे. अजाण, अनावर स्वभावाच्या व्यक्तींच्या सहवासात असणे नक्कीच हितकारक नाही; विशेष करून जे व्यसनी म्हणून गणले जातात, मग ते व्यसन कसलेही असो.

आसक्त प्रवृत्तीतून जागरूकतेकडे वाटचाल

तुमचे सर्व प्रयत्न आसक्त प्रवृत्तीपासून मुक्त होऊन, जागरूकतेकडे जाण्याचा आहे. म्हणून अगदी आसक्त स्वभावाच्या व्यक्तींचा सहवास सहायक नाही. तुम्ही अजून अशा स्थितीत नाही की कशाही प्रकारच्या माणसांमधे वावराल आणि तरी सुद्धा त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम न होऊ देता, पूर्णपणे जागरूक आणि अविचलित राहाल.  तुम्हालाही व्यसन लागू शकेल किंवा नाही; मी आशा करतो तुम्हाला ते लागणार नाही पण तरी सुद्धा अनेक प्रकारे त्याचा परिणाम होतोच.

जर सभोवतालच्या गोष्टींचा काहीच परिणाम होत नसता तर कोणी आश्रम बांधायचा खटाटोप कशाला केला असता?  एखाद्या आध्यात्मिक स्थळाची व्यवस्था राखणं एक मोठी डोकेदुखी असते कारण आध्यात्मिक स्थळ म्हणजे खवळलेल्या सागराच्या मधे असलेल्या ओएसीस प्रमाणे असते.  आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा त्यावर परिणाम होऊ न देता एका द्वीपाप्रमाणे त्याची काळजी राखणं एवढ सोपं नाही. 

साधारणपणे दररोज अंदाजे सात हजार लोक ईशा योग केंद्राला भेट देतात. त्यांचं स्वागत करणं, त्यांना केंद्राच्या कार्यक्रमांत सहभागी करणं आणि तरीदेखील त्यांच्या सहवासाचा परिणाम होऊ न देणं हे एक मोठं आव्हान आहे. यासाठी अतिशय खंबीर लोकांची गरज लागते. नाहीतर येणारा प्रत्येकजण त्यांचे घर, वस्ती, शहर यांचा प्रभाव आपणासोबत घेऊन येतो आणि तो आश्रमात लागू करू पाहतो. लोक त्यांच्या लहरी, कल्पना, त्यांच्या आवडीनिवडी इथे अंमलात आणू पहातात. येणारा प्रत्येकजण आपली काहीतरी छाप सोडायचा प्रयत्न करतो. काहीजण विचारून काही गोष्टी करायचा प्रयत्न करतात तर  काही जण बिनदिक्कतपणे करून मोकळे होतात. कधी नम्रपणे तर कधी खंबीरपणे त्यांना तसं करण्यापासून रोखणं सोपं नाही. आश्रम उभारण्याचा उद्देशच एका अशा स्थळाची व्यवस्था राखण्याचा आहे जी एका विशिष्ट हेतूला समर्पित आहे.

तुम्ही कुठेही राहिलात तरी तुम्ही ज्या उद्देशाने तिथे राहताय त्यादृष्टीने त्या जागेची व्यवस्था राखली गेली पाहिजे. तुमची स्वत:ची जागा तुमच्या ध्येयानुसार राखली गेली पाहिजे, इतरांच्या अनावर जीवन पद्धतीनुसार नव्हे. हे अतिशय महत्त्वाचं आहे; जोपर्यंत तुम्ही अशा अवस्थेला पोहोचत नाही की नरकात जरी गेला तरी निर्लेप मनाने परत याल. सध्या तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या आहारी जाऊ शकता. स्वत:विषयी अवास्तव कल्पना बाळगू नका!

योग्य व्यक्तींचा सहवास

आपल्यासाठी योग्य स्थानाची व्यवस्था करणे आणि गरज भासल्यास नकारात्मक प्रभावापासून दूर जाणे तुमच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे फक्त व्यसनी लोकांपासून दूर राहण्याबद्दल नाही, तर सर्व प्रकारच्या अतिरिक्त आसक्त प्रवृत्तीना टाळण्याबद्दल आहे. लोक आपल्या आसक्त प्रवृत्तीनां पूर्णपणे वाहिलेले असतात.

आजकाल तुम्ही ज्याला ‘नॉर्मल’ कुटुंब म्हणता त्याकडे जर बारकाईने पाहिलं तर – इथं नॉर्मल म्हणजे त्या घरातली मुलं व्यसनी नाहीत, नवरा दारुड्या नाही आणि बायकोला शॉपिंगचं व्यसन नाही - तरी ते ज्या प्रकारे जगतात, ते जागरूकतेच्या अगदी विरूद्ध आहे.  बहुतेक लोक ज्या व्यक्तींच्या संगतीत राहतात त्याप्रकारे त्यांचे आयुष्य आकाराला येते. तरी संगतीचा प्रभाव व्यक्ती व्यक्तींवर कमी जास्त असू शकतो पण नक्कीच अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम होतो.

आजच्या घडीला मी कोणाच्या सहवासात आहे याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. पण मी आज जसा आहे तो पूर्वी मी ज्या संगतीत होतो त्याचा परिणाम आहे. त्यावेळी जर मी चुकीच्या संगतीत गेलो असतो तर आज गोष्टी नक्कीच वेगळ्याच असत्या. त्याकाळी मला जे लागू होतं ते तुम्हाला आत्ता लागू आहे. तुमच्या विकासासाठी एक तर तुम्ही योग्य संगतीत राहिले पाहिजे किंवा चुकीची संगत कटाक्षाने टाळली पाहिजे.